नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा दिल्लीत जाऊन काही बड्या नेत्यांची भेट घेत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भाने चर्चा केली. त्यावेळी, व्हीएसआर कंपनीचे मालक, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि प्रफुल पटेल यांचे नाव घेत काही सवालही उपस्थित केले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू स्वतः रोहित सिंगच्या लग्नाला उपस्थित होते, त्यांच्यासोबत राममोहन होते मग तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. हे संबंध असल्यामुळेच अजित पवारांना न्याय मिळू शकत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, जय पवार यांच्याकडे माहिती आहे, ती ते देतील, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांसमवेत विमान दुर्घटनेत दगावलेल्या पिंकी माळीचे कुटुंबीय देखील आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी बोलत आहेत. घाटकोपरला विमान पडलं तेव्हा भाजपच्या किरीट सोमय्या यांनी FIR केला होता. मग, आज ते पोलीस FIR का करत नाहीत. प्रफुल्ल पटेल यांना माहिती होतं की रोहित सिंग यांचा कोणाशी संबंध आहे, त्यामुळेच आम्ही प्रफुल्ल पटेल यांच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी थांबलो आहे. जय पवार यांच्याकडे माहिती आहे, ती ते पुढे आणतील, असे म्हणत रोहित पवारांनीही जय पवार यांच्या पत्रकार परिषकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच, माझं प्रफुल्ल पटेलांसोबत खूप चांगलं होतं असं नाही, कदाचित काकूंना माहिती नसेल की प्रफुल्ल पटेल रोहित सिंगच्या लग्नाला होते, असेही रोहित यांनी म्हटले.
शिवराज सिंग यांच्याकडे इशारा
रोहित सिंगच्या लग्नाला मध्य प्रदेशचे मोठे नेते होते, आता ते दिल्लीत आले आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे इशारा केला आहे. तसेच, चार पाच दिवस जाऊ द्या, असेही त्यांनी म्हटले.
समाजवादीच्या खासदारांना भेटणार
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आम्हाला बराच वेळ दिला, त्यांनी सांगितलं की समाजवादी पक्षाच्या खासदारांना आम्ही भेटावं, त्यांना याबाबत सांगावं. त्यामुळे, आज संध्याकाळी आम्ही सपा खासदारांना भेटणार आहोत, कानिमोली यांनाही भेटणार आहोत, सोरेन यांनाही भेटणार आहोत, या सगळ्यांना भेटल्याशिवाय आम्ही दिल्लीतून जाणार नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले.
कोणी मायका लाल जय पवारांवर दबाव आणू शकत नाही - मिटकरी
अजित पवारांच्या अपघातावर विधिमंडळात चर्चा का केली जात नाही. कशाच्या दहशतवादीखाली सगळे आमदार आहेत? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. व्ही.के. सिंग यांच्या लग्नात कोण गेले? हे मला माहित नाही, आमदार रोहित पवार यावर सांगतील. जय पवार यांची आज पत्रकार परिषद होती मात्र ती पुढे ढकलली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे जय पवार मांडतील. कोणी माय का लाल आहे, जे जय पवारवर दबाव आणतील. जर कोणी असं प्रेशर आणेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे, ते पुण्याला काही कामानिमित्त गेले आहेत. त्यामुळे ते लवकरच पत्रकार परिषद घेतील, अशी माहिती मिटकरी यांनी दिली.